पुणे : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून एलआयसी चे नाव आहे. एलआयसी नेहमीच विविध योजना, पॉलिसी जाहीर करीत असते. काही पॉलिसी बंद कराव्या लागतात, अशाच दोन योजना एलआयसीने बंद केल्या आहेत. पण ज्यांनी यात पैसे गुंतवले आहेत, त्यांची पैसे सुरक्षित राहणा असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजना एलआयसीने बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म नवीन पद्धतीने लाँच केले आहे. त्यांना न्यू जीवन अमर आणि न्यू टेक टर्म अशी नावे देण्यात आली आहेत. या दोन्ही पॉलिसी एलआयसीने बंद करून पुन्हा नवीन प्रीमियम रकमेसह सुरू केल्या आहेत. या दोन्ही पॉलिसी नॉन-लिंक केलेल्या आणि नॉन-पार्टिसिपेटिंग योजना आहेत, याचा अर्थ पॉलिसीधारक निश्चित प्रीमियम भरेल आणि नंतर हमी परतावा मिळेल.
एलआयसी टेक टर्म ही ऑनलाइन पॉलिसी होती. तर एलआयसी जीवन अमर ऑफलाइन होती. LIC च्या परिपत्रकात म्हटले आहे की 23 नोव्हेंबर 2022 पासून दोन्ही मुदतीच्या योजना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विमा दर वाढल्यामुळे मुदत योजना मागे घेण्यात आल्या आहेत.
जीवन अमर योजना ऑगस्ट 2019 मध्ये आणि टेक टर्म प्लॅन सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. लॉन्च झाल्यापासून या योजनांचे प्रीमियम दर वाढवले गेले नाहीत. कंपनीने नवीन सुधारणांसह नवीन योजना लॉन्च केल्या आहेत.
दोन्ही पॉलिसी त्यांच्या सेवेच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम देतात आणि 10 ते 40 वर्षांची पॉलिसी मुदत देतात. LIC जीवन अमर प्लॅनसह किमान 25 लाखांचा विमा उतरवला जाऊ शकतो. LIC टेक टर्म प्लॅनसह किमान 50 लाखांचा विमा घेतला जाऊ शकतो. या दोन्ही योजनांमध्ये पैसे गुंतवण्याची कमाल मर्यादा नव्हती. तसेच, एलआयसी टेक टर्म प्लॅन एलआयसी जीवन अमरपेक्षा स्वस्त होता.