मेरठ: पैशांची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा अंगावर काटा आणणारा प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये उघडकीस आला आहे. 2 कोटी रुपयांचा विमा आणि सरकारी नोकरीचे लाभ मिळवण्यासाठी एका नराधम पतीने आपली पोलीस कॉन्स्टेबल पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. अपघाताचा बनाव रचून रचलेला हा खुनाचा कट रामपूर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दान, नूर आणि सलमान या तिघांना ताब्यात घेतलं आहे.

आरोपी दान सिंग याने आपली पत्नी लता आणि मुलगा अवांश यांच्या हत्येचा कट अत्यंत थंड डोक्याने रचला होता. नैनितालहून परतताना त्यान जाणीवपूर्वक गाडी एका डम्परशी धडकवली. त्यानंतर निर्जनस्थळी गाडी थांबवून त्याने पत्नी आणि मुलाला गुंगीचे औषध मिसळलेले शीतपेय दिले. दोघेही बेशुद्ध झाल्यानंतर दानने आपल्या साथीदारांना बोलावले आणि गाडीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली.

यात चिमुकल्या अवांशचा जळून अंत झाला. मात्र, आगीच्या ज्वाळा लागताच लता शुद्धीवर आली आणि गाडीतून बाहेर पडली. मरणाच्या दारात असतानाही तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण क्रूर दान सिंगने तिला दुसऱ्या गाडीत कोंबले आणि हातोड्याने डोक्यावर वार करून तिचा जीव घेतला.

तपासातून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, लता ही दानची दुसरी पत्नी होती. विशेष म्हणजे, दान सिंगच्या पहिल्या पत्नीचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.
सुरुवातीला दान सिंगने हा एक भीषण अपघात असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, गाडी जळून खाक झालेली असताना दान सुखरूप कसा वाचला? हा प्रश्न पोलिसांना पडला. फॉरेन्सिक तपासात गाडीत पेट्रोलचे अंश सापडले आणि लताच्या डोक्यावरील जखमा अपघातातील नसून हातोड्याच्या असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हा अपघात नसून नियोजित कट असल्याचे समोर आले. दरम्यान, “आम्ही आता पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही पत्नीच्या मृत्यूचा तपास करत आहोत,” असे पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी स्पष्ट केले आहे.







