योगेश मारणे
शिरूर : पिंपळसुटी(ता.शिरूर)येथे आज (दि.०७)सकाळी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. त्याचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे आहे. अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाटच असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले, तरी नरभक्षक बिबट्या मात्र मोकाटच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपळसुटी येथे रक्षा निकम या दोन वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात १५ पिंजरे लावण्यात आले होते. तब्बल १६ दिवसांनी जेथे रक्षा निकम हिच्यावर बिबट्याने हल्ला केला तेथून फक्त पाचशे मीटर अंतरावरच बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, तो नरभक्षक बिबट्या नसल्याचे बोलले जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
जेरबंद केलेल्या बिबट्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असून, त्यानंतरच तो नरभक्षक आहे की नाही ते स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी पकडलेला तो बिबट्या नरभक्षक नसल्याचे सांगितले जात आहे. शिरूरच्या पूर्व भागात बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे बिबटे जेरबंद करावेत अशीच मागणी या परिसरातून जोर धरत आहे. बिबटे जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे निर्माण झाले आहे.