नागपूर: नागपूर शहरातील गोरेवाडा बचाव केंद्रात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गोरेवाडा प्रशासनासह वनविभागाचे धाबे दणाणले आहेत. भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानंतर मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना आहे. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील प्राणिसंग्रहालयांना ‘हाय अलर्ट’ चा इशारा देण्यात आला आहे.
मानव व वन्यजीव संघर्षांमुळे डिसेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून तीन वाघ आणि बुलढाणा येथून एक बिबट जेरबंद करण्यात आले होते. तिन्ही वाघ गोरेवाड्यातील बचाव केंद्रात होते. त्यांचे पिंजरे एकमेकांना लागून होते. बिबट हा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात होता. वाघांना स्थलांतरित केल्यानंतर आरोग्य तपासणी केली असता, त्यांना कोणताही आजार नव्हता, त्यांच्यात बर्ड फ्लूची लक्षणे नव्हती, मात्र ते थोडेफार लंगडत होते. जेवण कमी घेत होते. त्याचवेळी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या; परंतु त्या नकारात्मक निघाल्या. यातील दोन वाघांचा व एका बिबट्याचा २० डिसेंबरला, तर एका वाघांचा २३ डिसेंबरला मृत्यू झाला. त्यामुळे गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही मृत प्राण्यांचे नमुने भोपाळ येथील आयसीएआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डीसीज येथे पाठवण्यात आले. आयसीएआरचे ‘अहवाल २ जानेवारी रोजी प्राप्त झाल्यानंतर तीन वाघ व एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
प्राणिसंग्रहालयांना ‘हाय अलर्ट’
बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. गोरेवाडा बचाव केंद्रातील इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ नये म्हणून पिंजऱ्यांचे निर्जंतुकीकरण आणि सफाईकरण करण्यात येत आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालये, बचाव आणि संक्रमण उपचार केंद्रांना (टीटीसी) सतर्कतेचा इशारा दिला आहे.