आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जांभोरी येथील शेतकरी भागुजी रामजी कॅगले यांच्या शेळ्या मंगळवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता जांभोरी गावातील इराचे रान परिसरात चरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाला.
त्यामुळे केंगले यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेघरच्या वनपाल सुवर्णा जगताप यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करून केंगले यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
ओतूरला बिबट्याची मादी जेरबंद
ओतूर हद्दीतील बाबीतमळा येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्याची मादी पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. बाबीतमळा ग्रामपंचायत हद्दीत वन विभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. १०) पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. सकाळी मादी जेरबंद झाल्याची माहिती वन विभागाला स्थानिकांनी दिली.