जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील खंडागळे मळ्यातील शेतकरी खंडू रुखमा खंडागळे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात ३ वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला आहे, मांजरवाडी येथे १८ डिसेंबर रोजी शेतकरी खंडू खंडागळे यांच्या घरात सायंकाळी साडेसातच्या दरम्यान बिबट्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याने वन विभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावला.
रविवारी (दि. २९) सकाळी पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाला म्हणून खंडू खंडागळे हे पाहण्यास गेले असता त्यांना बिबट्या पिंजऱ्यात शांतपणे बसल्याचे दिसले. त्यांनी वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना याबाबत माहिती दिली.
ते घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले. नारायणगाव पोलिस ठाण्याच्या ग्रामसुरक्षा दलाचे जवान तुषार टेके, रामकृष्ण चोपडा, आपदा मित्र सुशांत भुजबळ, मांजरवाडीचे पोलिस पाटील सचिन टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे, खंडू खंडागळे, उपसरपंच संतोष मोरे यांनी पिंजरा वन खात्याच्या गाडीत टाकण्यास मदत केली.
बिबट्याला पकडण्यात उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वन परिमंडळ अधिकारी अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांची विशेष मदत झाली. बिबट्या पकडला असला तरी या परिसरात बिबट्या व तिचे बछडे यांचा वावर असल्याचे नागिरकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.