शिरूर: वडगाव रासाई (ता. शिरुर) येथील सगणाई मळ्यात दुसरा बिबट्याही जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले आहे, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, बिबट्याची भिती कायम आहे. मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे एका महिन्यात दोन बालकांवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले आहे. त्यामुळे वनविभागाने मांडवगण फराटा व वडगाव रासाई परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.
मागील आठवड्यात शेलारवाडी परिसरात एक बिबट्या जेरबंद करण्यास वनविभाग यशस्वी झाला आहे. तर येथीलच सगणाई मळ्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुसरा एक बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, मांडवगण फराटा परिसरातील नागरिक मात्र अजुनही भयभितच आहेत. वन विभागाने जेरबंद केलेले दोन्ही बिबटे नरभक्षकच आहेत. याबाबत मात्र वन विभागाकडून खात्रीशीर माहिती मिळाली नाही. जेरबंद करण्यात आलेला बिबट्या वन विभागाने जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात सोडला आहे.