जुन्नर : राजुरी येथे सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याच्या खाल्ल्यात खिल्लारी जातीच्या कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजुरी (ता. जुन्नर) येथील घंगाळे मळा शिवरातील ज्ञानेश्वर सदाशिव घंगाळे यांच्या गोठ्यात बुधवारी (दि. २५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारात बिबट्याने बंदिस्त गोठ्याची तार वाकवून आतमध्ये प्रवेश केला आणि खिलारी जातीची कालवड जागीच ठार केली.
ज्ञानेश्वर घंगाळे यांना गाईंच्या हंबरण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी गोठ्यातील दरवाजा उघडून पाहिले तर बिबट्या कालवडीवर हल्ला करताना पाहिले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कालवडीचा पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील लोखंडे मळ्यात ह.भ.प. निवृत्ती महाराज लोखंडे यांच्या घरासमोर असलेल्या पामोलियन जातीच्या कृष्णा या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पारगाव परिसरात बिबट्यांची दहशत सुरूच आहे. येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आवारात तीन ते चार बिबट्यांचा वावर असल्याचे निष्पन्न झाले. तेथे वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला आहे. पारगाव ते मंचर रस्त्यावर लोखंडे मळ्यात राहणाऱ्या ह.भ.प. निवृत्ती महाराज लोखंडे यांच्या घराच्या अंगणात पामोलियन जातीच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास हल्ला करून त्याला जागीच ठार केले. वर्ना वभागाने पारगाव परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी निवृत्ती महाराज लोखंडे यांनी केली आहे.