लोणी काळभोर : वडीलोपार्जित जमिनीच्या मालकी हक्काच्या वादावरून एका वकिलाला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना मांजरी बुद्रुक (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन कल्टीव्हेट अॅग्रो फार्म समोर रविवारी (ता. 5) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत वकील गंभीर जखमी झाला आहे. तर हडपसर पोलीस ठाण्यात 38 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय रामदास घुले (वय 28) असे जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे. तर आनंदा घुले, आकाश पांडुरंग घुले, आशिष घुले, कृष्णा बेल्हेकर, पुष्पा घुले, रूक्मिणी घुले, त्रुषी भासले, गोकुळ घुले, गोकुळ घुलेची पत्नी, बाळासाहेब सिताराम घुले आणि त्यांची आई, कुणाल घुले आणि त्यांचे २५ पेक्षा जास्त सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश रामदास घुले ( वय-36, रा. फ्लॅट नं.१, आई बिल्डींग, मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश घुले व अक्षय घुले हे दोघे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी आणि आरोपीच्या वडीलोपार्जित जमिनीच्या मालकीवरून काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. हा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयात सुरु आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 4) आरोपींनी शेतातील चंदनाची आणि इतर झाडे तोडली. त्यानंतर टेम्पो मधुन झाडे घेऊन चालले होते. तेव्हा फिर्यादी महेश घुले यांनी टेम्पो अडविला. या जमिनीचे मालकीचा विषय कोर्टात चालु आहे. विनापरवानगी, बेकायदेशीरपणे तुम्ही ही झाडे घेऊन जाऊ नका, असे फिर्यादी यांनी सांगितले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी महेश घुले व त्यांचा लहान भाऊ अक्षय घुले या दोघांना हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली. तर अक्षय घुले याला लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपींनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आमची ताकद तुला दाखवु का? तु माझे काही वाकडे करू शकणार नाही, असे म्हणून आरोपी पसार झाले.
दरम्यान, या मारहाणीत अक्षय घुले हा बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. त्याच्या उजव्या कानातुन, डोळयातुन आणि नाकातून रक्तस्त्राव झाला. महेश घुले यांनी लहान भाऊ अक्षयला उचलुन वरद हॉस्पीटल येथे उपचारासाठी घेउन गेले. मात्र, त्याचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. म्हणून त्याला पुढील उपचारासाठी सहयाद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी महेश घुले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात 38 हून अधिक जणांवर भारतीय न्याय दंड संहिता २०२३ चे कलम 109,189 (2), 189(4), 189(5) ,189(8),189(9),351 (2)(3),352,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.