सुरेश घाडगे
परंडा : न्यायालयातील ई – प्रकरण प्रणालीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन कामकाजामध्ये करुन पक्षकार यांचा बहुमुल्य वेळ, श्रम वाचून आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने तसेच कागद निर्मिती तथा कागदपत्रासाठी कांही अंशी वृक्षतोड होते ती थांबावी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत व्हावी, वृक्षसंवर्धन व पर्यावरणाच ऱ्हास थांबवा या उद्देशाने पेपरलेस तथा कागद विरहित न्यायालय करण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील ३० न्यायालयात या प्रणालीची सुरूवात झालेली आहे . तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर न्यायालयापाठोपाठ आता परंडा न्यायालयात सुरुवात होत आहे, असे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद अध्यक्ष श्रीमती अंजु.एस. शेंडे यांनी परंडा येथे केले .
परंडा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ई – प्रकरण प्रणालीचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद श्रीमती अंजु.एस. शेंडे यांचे हस्ते व अध्यक्षतेखाली शुक्रवार ( दि. ९ ) दुपारी २ वाजता करण्यात आले .
यावेळी दिवाणी न्यायाधीश व स्तर तथा तालुका विधी सेवा समिती परंडा अध्यक्ष आर.टी. इंगळे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद सचिव वसंत एस. यादव,सह दिवाणी न्यायाधीश क स्तर परंडा आय. जी. महादेवकोळी ,विधीज्ञ मंडळ परंडा अध्यक्ष अॅड . एस. एस. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी जेष्ठ विधिज्ञ अॅड . दादासाहेब खरसडे यांना ई फाईल देण्यात आली.सुत्रसंचलन अॅड .राजेंद्र काळे यांनी केले . यावेळी सर्व विधिज्ञ व न्यायालय कर्मचारी उपस्थित होते .