लातूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलीवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता लातूरमधील तीन अल्पवयीन मुलींवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या देवणी तालुक्यातील एका गावात तीन अल्पवयीन मुलींवर 55 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला आहे. या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. या तिन्ही मुलीं आरोपी व्यक्तीला आजोबा बोलतात.दुपारच्या सुमारास या व्यक्तीने या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून शेतात नेले. त्याठिकाणी त्याने तिघींवर देखील लैंगिक अत्याचार केले. ओळखीची व्यक्ती असल्यामुळे या मुली आजोबासोबत गेल्या आणि त्यांच्यासोबत भयंकर घडलं. या प्रकाराबाबत कोणालाही न बोलण्याची धमकी त्या मुलींना दिली.
दरम्यान घडल्या प्रकाराची सर्व माहिती पीडित मुलींनी कुटुंबियांना सांगितली. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तात्काळ देवणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीवरून देवणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.