Latur Accident: लातूर : अहमदपूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अहमदपूर बायपासजवळ भरधाव वेगात येणारी ह्युडाई क्रेटा (MH 24 AT 9777) ही कार समोर जाणाऱ्या ट्रकला प्रचंड वेगाने धडकली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रविकुमार तुकाराम दराडे (वय 20, रा. कराड नगर, अहमदपूर) आणि सागर दिलीप ससाने (वय 20, रा. फतेपूर, अहमदपूर) अशी मृत झालेल्या तरुणांची ओळख झाली आहे. दोघेही शिरूर ताजबंद येथे जेवण करून मध्यरात्रीनंतर भरधाव वेगाने अहमदपूरकडे येत होते. रस्त्यावरून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या मागे अचानक कार आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, या कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर ट्रकचे मोठे नुकसान झाले असून मागील चार टायर तुटून पडले. प्राथमिक तपासात क्रेटाचा वेग तब्बल 120 ते 140 km/hr दरम्यान असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कार पूर्णपणे ट्रकखाली दबल्यामुळे क्रेनच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आले आणि दोन्ही तरुणांचे मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी मृतदेहांना शासकीय ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतदेह प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या भीषण अपघातामुळे रस्त्यावर एकच खळबळ उडाली होती.





