Lonavala Accident: मावळ : लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात गोव्यातून फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुण पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या कारची समोरून येणाऱ्या डंपरशी जोरदार धडक झाल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. (Lonavala Accident)

हेही वाचा- भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रकला धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील म्हापसा येथील राहत असलेले योगेश सुतार (वय 21) आणि मयूर वेंगुळकर (वय 24) हे दोघे मित्र लोणावळा येथे पर्यटनासाठी आले होते. लोणावळ्यातून सहारा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, शिवलिंग पॉईंट परिसरात त्यांच्या कारवरील नियंत्रण अचानक सुटले. कार समोरून येणाऱ्या डंपरला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
धडकेनंतर कारमध्ये अडकलेल्या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, लोणावळा ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस या अपघाताचे नेमके कारण शोधत असून वाहनांचा वेग आणि रस्त्याची स्थिती याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याचा देखील शोध घेत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.





