नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्या आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घरात लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर अनेकवेळा कफ सिरप दिलं जातं. पण आत हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरताना दिसत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ जानेवारीला खोकल्याच्या उपचारासाठी एका लहान बाळाला आणण्यात आलं होतं. यावेळी त्या बाळाला तपासून कफ सिरप दिल. मात्र त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. त्यानंतर संबंधितांनी ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केली. यावेळी त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
तेथे हे औषध लहान मुलांना दिलं जात असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली. आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले असता, आरोग्य प्रशासन बे भरोसे वर सुरू असल्याचा आरोप पाडवी यांनी केला.
सातपुड्याच्या दुर्गम रागांमध्ये मुदत संपलेले औषध प्राथमिक केंद्रात सर्रास पणे दिले जातात. त्यातलाच हा एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात औषध साठा गेला असेल तर तो सिल करण्यात यावा. तसेच संबधित कर्मचारी आणि पुरवठा दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याच्या इशारा आमदार पाडवी यांनी दिला आहे.