पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात आधिराज्य गाजविणारा सप्तहिंदकेसरी मन्या बैल बैलगाडा शर्यतीतुन कायमचा गेला आहे. खेड तालुक्यातील वाफगाव येथे मन्या बैलाचा दहा दिवसांपुर्वी अंत्यविधी झाला होता. त्याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. या बैलाच्या दशक्रिया विधीसाठी पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांसह चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
प्रत्येकाच्या डोळ्यांसमोरून मन्या बैलाचा प्रवास जात होता. राजू जवळेकर यांनी पोटच्या लेकराप्रमाणे मन्या बैलाचा संभाळ केला होता. बैलगाडा घाटात धावणाऱ्या मन्याचे अनेक रेकॉर्ड त्याने स्वतःच मोडीत काढले होते. अनेक बक्षिसे सुद्धा त्याने पटकावली होती. हा बैल आपल्यातून हरपल्याच्या भावना व्यक्त करत मन्याचा पुतळा उभारला आहे.
बैलगाडा शर्यतीत सप्तहिंदकेसरी ठरलेल्या मन्या बैलाचं २६ फेब्रुवारीला निधन झालं. मन्या बैलाच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्या दशक्रिया विधीलासुद्धा मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत प्रेमींनी गर्दी केली होती. बुधवारी मन्या बैलाचा दशक्रिया विधी पार पडला. या दशक्रिया विधीला पुणे, अहमदनगर, साताऱ्यासह राज्यातून मन्या बैलावर प्रेम करणारे बैलगाडा शर्यत शौकिन उपस्थितीत होते.
१८ वर्षे बैलगाडा शर्यतीत दबदबा
मन्या बैलाला २००६ मध्ये पहिल्यांदा गाड्याला जुंपले होते. तर यावर्षी २० फेब्रुवारीला तो खेड तालुक्यात झालेल्या बारीत उतरला. तिथेही मन्या घाटाचा राजा ठरला. गेल्या १८ वर्षांपासून त्याने शर्यतींचे मैदान गाजवले होते. मन्याने आतापर्यंत १५० दुचाकी, ६० बुलेट, २ ट्रॅक्टर, २ बोलेरो, १ थार, १ स्कॉर्पिओ यासह लाखोंची बक्षीसे मिळवली.