सुरेश घाडगे
परंडा : मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्यांप्रमाणे ओबीसी प्रवर्गातुन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण महामोर्चा मंगळवार ( दि .८ ) परंडा येथे ( जि. उस्मानाबाद ) आयोजित करण्यात आला असून या महामोर्चात लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी सहकुटूंब सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या –
१) मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गातुन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे.
२) मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा मराठा, मराठा हे सर्व एकच असल्याने मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा.
३) मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा व्याज परताव्यासाठी ५० लक्ष रुपये करावी
४) मराठा समाजाला कुणबी समजण्याची अधिसूचना निर्गमित होईपर्यंत ०५ एकर जमीनीची अट शिथील करून इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळवा.
५) ८ लाख रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व मराठा पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करावी.
६) पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृह जिल्हा व तालुका पातळीवर त्वरीत सुरु करण्यात यावेत.
७) शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी स्वामीनाथन आयोग लागु करावा.
महामोर्चा स्वरूप – मंगळवार दि .८ रोजी सकाळी १० वा . छत्रपती संभाजी महाराज चौक ( करमाळा – सोनारी रोड गोलाई ) ते कोटला मैदान, रुई रोड येथ पर्यंत मोर्चा पदयात्रा काढण्यात येईल. तद्नंतर कोटला मैदान येथे मराठा समाजाला संबोधित करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच मुलींची भाषण होईल. शेवटी मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच मुली व महिला मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देतील.
महामोर्चा मार्ग – छत्रपती संभाजी महाराज चौक प्रारंभ, नाथ चौक, संतसेना महाराज चौक-खासापुरी चौक ,महाराणा प्रताप चौक -बावची चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,मार्गे कोटला मैदान- रुई रोड .
महामोर्चा – घोषणा – जय जिजाऊ…. जय शिवराय…
एक मराठा…. लाख मराठा….आरक्षण नाही….. मतदान नाही…..तुमच आमच नात काय…. जय जिजाऊ… जय शिवराय…
महामोर्चा प्रारंभ ते समारोप -प्रारंभ मंगळवार दि .८ रोजी सकाळी १० वाजता.समारोप दुपारी ४ वाजता.
पार्कींग व्यवस्था – करमाळा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था ईदगाह मैदान काशीमबाग जवळ, सोनारी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था संत मीरा पब्लिक स्कूल, पाचपिंपळा मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था श्री. दत्त पेट्रोलियम पंप समोर ,खासापुरी मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संत ज्ञानेश्वर डेअरी आणि अग्निशमन केंद्र, बावची मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था महात्मा गांधी विद्यालय, रुई मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बावची विद्यालय, बार्शी मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सीना- कोळगाव कॉलनी, देवगाव ( खु . ) व कुर्डुवाडी- मुंगशी मार्गे येणाऱ्या वाहनांची व्यवस्था कै. महारूद्रबप्पा मोटे महाविद्यालय .
मोर्चा दरम्यानची आचारसंहिता – मोर्चा शांततेत व निश्चित करण्यात आलेल्या मार्गानेच निघेल. मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाच्या, संघटनेच्या व व्यक्तीच्या विरोधात कींवा समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या जाणार नाहीत, मोर्चात प्रथम विद्यार्थीनी, महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य जनता नंतर शेवटी राजकीय, संघटना नेते,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते रहातील. मोर्चा मध्ये सहभागी झालेला प्रत्येक मराठा व्यक्तीला पोलीस, समन्वयक व स्वंयसेवक यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन करावे लागेल.गडबड गोंधळ कींवा मोर्चाला बाधा येईल असे वर्तन करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब पोलीसांच्या ताब्यात दिले जाईल.
मोर्चा सभास्थळी आल्यावर त्या ठीकाणी समन्वय समितीने ठरवलेल्या पाच मुलीशिवाय कोणत्याही व्यक्तीला बोलण्याची संधी मिळणार नाही.या मोर्चात कोणी मोठा नाही किंवा कोणीही छोटा नाही सर्व मराठा बांधव सारखेच असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. मोर्चामध्ये सर्व मराठा बंधू-भगिनींना पोलीस प्रशासन, स्वंयसेवक व समन्वयक यांच्या सुचनेप्रमाणे रांगेमध्येच चालावे लागेल, मनमानी करता येणार नाही. मोर्चात ठराविकच घोषणा असतील व त्या स्वंयसेवक देतील त्यास पाठीमागे आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे. आपणास वाटेल ती घोषणा देता येणार नाही. हा मोर्चा सीसीटीव्ही , विविध कॅमेरे, मिडीया तसेच ड्रोन कॅमेरा या नियंत्रणाखाली असल्यामुळे आपली प्रत्येक हालचाल पोलीस यंत्रणेला दिसणार आहे याची नोंद घ्यावी.
सभा नियोजन – सभामंचच्या उजव्या बाजूला महिलांची बैठक व्यवस्था असेल, समोरील बाजूस शाळा कॉलेजच्या मुली, त्यानंतर महिला असतील. सभामंचच्या डाव्या बाजूला पुरुषांची बैठक व्यवस्था असेल. समोरील बाजूस शाळा कॉलेजची मुले त्यानंतर सर्वसामान्य व्यकी व शेवटी लोकप्रतिनिधी, पक्ष, संघटनाचे पदाधिकारी, राजकीय व्यकी. सभेच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, पेय किंवा इतर कोणताही स्टॉल लावता येणार नाही. सभेच्या ठिकाणी पक्ष, संघटना किंवा वैयक्तीक फोटो असलेले बॅनर लावता येणार नाहीत. सभेच्या वेळी पक्ष, संघटना किंवा व्यक्तीच्या विरोधात किंवा समर्थन करणाऱ्या घोषणा देता येणार नाहीत. सभेच्या ठिकाणी स्वंयसेवक, समन्वयक तसेच पोलीस प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. सभेच्या वेळी सुचनाचे पालन न करता काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास ताबोडतोब पोलीसाच्या ताब्यात दिले जाईल. मंचावर फक्त मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पाच मुली, पाच महिला व सुत्रसंचालन करणारा एक व्यक्ती उपस्थित असेल .
सभा स्थळी जमलेल्या सर्व मराठा बांधवानी शांतता व स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.