सिंधुदुर्ग: निसर्ग सौंदर्यतेने नटलेल्या कोकणाला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पसंती आहे. इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह कोकणात पर्यटन स्थळांवर दाखल झाले आहेत. कोकणातील किनारपट्टीवर सर्वाधिक पसंती पर्यटकांची दिसून येत आहे. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर, वेंगुर्ले, तारकर्ली, निवती, देवबाग, मालवण, आचरा, देवगडसह रत्नागिरी समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकांचा मोठा ओढा आहे.
त्यामुळे या ठिकाणच्या हॉटेल, लॉजिंग येथे गर्दी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉल्फिन दर्शन, स्कुबा ड्रायव्हिंग, बोटिंग, घोडेस्वारी, बनाना राइड्स, जेट स्काइ, पॅरासेलिंग, उंटसफारी यासाठी पर्यटकांनी विविध पर्यटन स्थळांवर हजेरी लावली व आनंद घेतला. नाताळ ख्रिसमस उत्सवाच्या निमित्ताने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांसमवेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून व देशी-विदेशी पर्यटक सध्या कोकणात येत असल्याने पर्यटन स्थळे गजबजली आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्यामुळे हॉटेलधारक, वाहनधारक, बोटिंग व्यावसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते व विविध प्रकारचे व्यवसाय या निमित्ताने तेजीत असल्याचे दिसत आहेत. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई- -गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी कोकणात दिसत आहे.