मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची घटना समोर येत आहे. मुंबईतील कांदिवली येथे कोठारे हिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाला. शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा अपघात असून यामध्ये तीदेखील गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला आहे. तिच्या कारचा मात्र चक्काचुर झाला आहे.
हा अपघात मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ झाला. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उर्मिलाच्या भरधाव कारने धडक दिली, त्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. अभिनेत्री उर्मिला कोठारी शुक्रवारी रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने धडक दिली, ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आली आहे. समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतून तिने 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. उर्मिला ही दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून आहे. या अपघातामध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे, याविषयी कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही.