लोणी काळभोर, ता. १७ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १७) विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या गाड्या थेट रस्त्यावर लावल्याने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे जवळपास ५ ते ७ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. याचा फटका अनेक वाहनचालकांना बसला.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरात शेकडो लग्न कार्यालये आहेत. सध्या लग्नसराई सुरु आहे. दिवसभराचे काम उरकून पाहुण्यांना विवाहाला उपस्थित राहता यावे, या उद्देशाने वधू-वर पिता मुहूर्ताची वेळ संध्याकाळची ठेवतात. हवेली तालुक्यातील पुढाऱ्यांना एकाचवेळी अनेक लग्नांची निमंत्रणे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी भेटी देत जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरातील लग्नाच्या वेळी ते उपस्थित राहतात.
हवेली तालुक्यातील नेतेमंडळींच्या भेटी रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत सुरू असतात. लग्न समारंभासाठी नेतेमंडळी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसते. कारण, येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, इच्छुक उमेदवार यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते. दरम्यान, लग्न समारंभ लवकर उरकून ताबडतोब पुढील कामासाठी आलेले पाहुणे त्यांची गाडी रस्त्यालगत लावतात. त्यामुळे पूर्व हवेलीत सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत होते. अनेकवेळा तर तासभरही कोंडी सुटत नाही. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण होते.
दरम्यान, कुंजीरवाडी (ता. हवेली) चौकातील एका मंगल कार्यालयात शनिवारी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी गाड्या सेवा रस्ता व महामार्गाच्या कडेला पार्क केल्या होत्या. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एचपी कंपनीच्या समोर एक डंपर भररस्त्यात बंद पडला होता. याच फटका अनेक वाहनचालकांना बसला.
हडपसर, लोणी काळभोर व उरुळी कांचन वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
लग्न समारंभासाठी आलेले स्थानिक नागरिक, पुढारी अथवा त्यांचे नातेवाईक सेवा रस्त्यावर गाडी लावतात. परिणामी, प्रचंड वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो. याकडे लोणी काळभोर व हडपसर पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
वाहतूक पोलिसांना पाठवण्याचे आश्वासन
दरम्यान, जेव्हा या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता तेव्हा त्यांनी ‘कुंजीरवाडी येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना पाठवतो आणि तत्काळ पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करून घेतो’, असे सांगितले.
महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच
पुण्यात नोकरी करत असल्याने दररोज पुणे-सोलापूर महामार्गावरून जावे लागते. कामावर जाताना व येताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन दिवस उशिरा ऑफिसमध्ये पोहचतो. परिणामी, कामाचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांनी यातून लवकर तोडगा काढावा, अशी माझी विनंती आहे.
– सूरज वाघमोडे, लोणी काळभोर (ता. हवेली)