बारामती : बारामती शहरातील सुहासनगर आमराई परिसरात हातात लोखंडी कोयता, कुऱ्हाड घेत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. रविवारी (दि. २२) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुहानगरमध्ये ही घटना घडली आहे.
अनिकेत केशवकुमार नामदास (वय १९, रा. दीपनगर, भवनीनगर, ता. इंदापूर), आदित्य राजू मांढरे (वय २२, रा. चंद्रमणीनगर, बारामती), यश दीपक मोहिते (वय १९, रा. इंदापूर रोड, बुरुड हौसिंग सोसायटी, बारामती) व शुभम ऊर्फ बाळू काळू जगताप (रा. आमराई, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार सोमनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही आरोपी हातात लांब लोखंडी कोयता व लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड घेऊन दहशत माजवत होते. या या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेत अटक केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे त्यांनी उल्लंघन केले. याप्रकरणाचा अधिक तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.