हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ते बिवरी बाजूकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या बाजूचा मुरूम मोठ्या प्रमाणात वाहून गेला असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरी पडली आहे. पाण्याच्या अति दाबाने हा बंधारा वाहून जाण्याची भीती कोरेगाव मुळ, बिवरी व अष्टापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाच्या पाण्यामुळे तसेच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मुळा- मुठा नदीला सोडण्यात आले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या बाजूचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पुलाची दुरुस्ती करावी तसेच पूलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची मागणी कोरेगाव मूळ व बिवरी व अष्टापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार याबाबत लेखी निवेदन दिले आहेत. मात्र प्रशासन एखादी घटना होण्याची वाट पाहत असल्याचा आरोप ग्रामस्थ करू लागले आहेत. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मुळा- मुठा नदीला सोडण्यात आले होते. जास्त झालेले पाणी नदीच्या पात्रात सोडल्यामुळे नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
कोरेगाव मूळ या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक ठप्प झाली होती व नागरिकांचे दळण वळण थांबले होते. नदीपात्रात पाणी कमी झाल्यामुळे बंधाऱ्याची खाली जाऊन नागरिकांनी पाहणी केली असता पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे बंधाऱ्याच्या बाजूला असलेला पूर्वेकडील बाजूचा मुरूम वाहून गेल्याचे दिसून आले. पुलाच्या कडेला मोठं मोठ्या दऱ्या निर्माण झाल्या असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बिवरी, अष्टापूर, वाडेबोल्हाई, डोंगरगाव या ठिकाणावरून नगर रस्त्याला जाणाऱ्या व येणाऱ्या चारचाकी, दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या वाहून गेलेल्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे मोठे परिणाम या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना भोगावे लागणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून बिवरी-कोरेगाव मूळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या जवळील नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी साचते तसेच झाडे झुडपे वाढल्याने व मुळातच ताकद कमी झालेल्या बंधाऱ्याचे चालू झालेल्या पावसाळ्यात नक्कीच मोठे नुकसान होणार आहे. बिवरीसह नदी पलीकडील गावाचा हवेलीच्या पूर्व भागातील उरुळी कांचन सह अन्य गावांचा संपर्क तुटणार हे नक्की !
दरम्यान, बंधाऱ्यावरून जाणारे विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांची अडचण होणार आहे. बिवरी, शिरसवडी, अष्टापुर येथील रहिवाश्यांना उरुळी कांचन येथे येण्यासाठी भवरापूर येथील पुलाचा वापर करावा लागणार असल्याने सुमारे १० ते १२ किलोमीटरच्या अंतराचा वळसा घालावा लागणार आहे.
याबबत अष्टापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ कोतवाल म्हणाले, “कोरेगाव मूळ या ठिकाणी असलेला पूल केव्हाही पडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत वारंवार अष्टापूर ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहेत. मात्र हे अधिकारी एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत. थेऊर येथील रस्ता बंद असल्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूकहि सुरु आहे.”
याबाबत कोरेगाव मूळ येथील माजी उपसरपंच लोकेश कानकाटे म्हणाले, “पाटबंधारे विभागाला वारंवार मागील पाच वर्षापासून निवेदन दिले आहेत. मात्र अधिकारी मात्र नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत. उद्या एखादी घटना झाल्यास या सर्वाला पाटबंधारे विभाग सर्वस्वी जबाबदार असणार आहे.”