अहमदनगर : येथील कोपर्डी (ता. कर्जत) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याने दलित तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात तीनपैकी दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. बंटी बाबासाहेब सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील तिस-या आरोपीच्या अटकेसाठी पोलीसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
सध्या कोपर्डी गावात शांतता पसरली आहे. या घटनेमुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी ही माहिती दिली. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे करत आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी कोपर्डी गावातील तमाशामध्ये नाचण्याच्या कारणावरुन विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे (३७) याला तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीनंतर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊन तमाशा बंद पडला. नितीन घरी परतत असताना रस्त्यात त्याला अचानक तिघांनी अडवले व गावातील स्मशानभूमीमध्ये नेत त्याला विवस्त्र करुन मारहाण केली. मारहाण केल्यानंतर नितीन त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने घरी निरोप पाठवून कुटुंबीयांकडून कपडे मागून घेतले व नंतर तो घरी आला.
या घटनेमुळे नैराश्य आलेल्या नितीनने दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने घडलेल्या घटनेसंदर्भात चिठ्ठी लिहिली होती. यासंदर्भात नितीनचे वडील कांतीलाल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक (तिघेही रा. कोपर्डी, कर्जत) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोन आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयापुढे हजर केले जाईल.