पुणे : पैसे उसने दिले होते. या पैशांची मागणी केल्याच्या रागाने अश्लील मेसेज करुन धमकी दिल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवा येथे महिलेच्या घरात ऑनलाईन पद्धतीने २०२० ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला.
याप्रकरणी कोंढवा येथील एनआयबीएम रोड येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेने बुधवारी (ता. १४) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुरेश निगुंडा नाईक (रा. निंगुर्डा नाईक, ता. आठानी, संगोनाती बेळगावी, कर्नाटक), सिद्धार्थ अशोक शिंदे (रा. कृष्णा नगर, महंमदवाडी रोड, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी सुरेश नाईक हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीला पैशांची आवश्यकता असल्याने फिर्यादींनी त्याला वेळोवेळी २० लाख ६० हजार रुपये उसने दिले होते. त्यापैकी आरोपीने १६ लाख ४० हजार रुपये परत केले. महिलेने उर्वरीत पैशांची मागणी केली असता, त्याने महिलेला इंग्रजीमध्ये टेक्स्ट मेसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी केली. तर आरोपीचा मित्र सिद्धार्थ शिंदे याने महिलेला फोन करुन ‘तुझी मुलगी कुठे शिकते मला माहीत आहे, तू त्याच्याकडे पैसे मागू नको,’ अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, आमची पोलिसांकडे तक्रार दिल्यास ‘आम्ही तुला व तुझ्या मुलीला जगू देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.