पुणे : शहरात किमान तापमानात किचिंत वाढ झाली असली, तरी थंडी कायम आहे. रविवारी (दि.५) पारा दोन अंशांनी वाढला असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस इतके होते. तर, एनडीएचे तापमान १०.२ अंशांवर होते. आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडीचा पारा १० अंशांच्या आसपास आहे. काही भागांत हुडहुडी भरणारी थंडी आहे. दरम्यान, पुढील पाच
दिवस आकाश निरभ्र राहील, तर दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तर, किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सकाळी थंडी तरी दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. शहरात कमाल तापमान ३१.५ अंश सेल्सिअस होते. हवेली येथे सर्वांत कमी ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ८.८ अंश सेल्सिअस होते.