पुणे : ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून अर्ज प्राप्त झाल्यापासून केवळ 72 तासांच्या आत रुग्णाला मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. त्याचबरोबर रुग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये अंगीकृत करण्यासाठी देखील कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर दिली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पुणे प्राईम न्यूजचे मुख्य संपादक आणि भारतीय जनता पक्षाचे सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते युवराज काकडे, व्याख्याते गणेश शिंदे, करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे उपस्थित होते.
पुढे बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता निधी’च्या माध्यमातून लक्षावधी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी समाविष्ट नसलेल्या खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आल्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये 275 कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच 35 हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1. अर्ज (विहीत नमुन्यात)
2. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रामाणित करणे आवश्यक.)
3. तहसीलदार कार्यालयाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला. (1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक)
4. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक.
5. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
6. संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. (Biopsy/ MRI/CT Scan/ Dylisys Circle/Angiography)
7. अपघातग्रस्त रुग्णांसाठी FIR रिपोर्ट / पोलीस डायरी रिपोर्ट आवश्यक आहे.
8. प्रत्यारोपणासाठी रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
9. संपूर्ण पेपर स्कैन करून पीडीएफ फाईल [email protected] या संकेत स्थळावर पाठवावे.
10. संबंधित रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे
1. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)
2. हृदय प्रत्यारोपण
3. यकृत प्रत्यारोपण
4. किडणी प्रत्यारोपण
5. बोन मॅरो प्रत्यारोपण
6. फुफ्फुस प्रत्यारोपण
7. हाताचे प्रत्यारोपण
8. हिप रिप्लेसमेंट
9. कर्करोग शस्त्रक्रिया
10. अपघात शस्त्रक्रिया
11. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
12. मेंदूचे आजार
13. हृदयरोग
14. डायलिसिस
15. अपघात
16. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
17. नवजात शिशुंचे आजार
18. गुडघ्याचे प्रत्यारोपण
19. बर्न रुग्ण
20. विद्युत अपघात रुग्ण
जर अर्थसहाय्याची मागणी [email protected] या ई-मेलव्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पोस्टाद्वारे तात्काळ पाठविण्यात याव्यात. राज्य सरकारच्या आरोग्यविषयक तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य देण्यात येते.