छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीयांचा विरोध असतानाही १७ वर्षीय चुलत बहीण प्रेमविवाह करण्यावर ठाम असल्याने संतप्त भावाने तिला चक्क २०० फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाळूज महानगरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चुलतभावाला ताब्यात घेतले आहे.
नम्रता गणेशराव शेरकर (रा. श्रीराम कॉलनी, शहागड ता. अंबड, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश ऊर्फ वैभव तानाजीराव शेरकर (रा. वळदगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी भावाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता १२ वीत शिकणारी नम्रता ही अंबड तालुक्यातील शहागड येथे आई-वडिलांसह राहत होती. तिचे वडील पूजापाठ करून उदरनिर्वाह करतात. घरी वडिलांसह कुटुंबाशी वाद होत असल्याने नम्रता १० दिवसांपूर्वी वाळूज येथील वळदगाव येथे तिचे काका तानाजीराव शेरकर यांच्याकडे राहायला आली होती.
दरम्यान, सोमवारी दुपारी चुलतभाऊ ऋषिकेश ऊर्फ वैभव शेरकर याने नम्रताला तुझे तुझ्या मित्राशी फोनवर बोलणे करून देतो असे सांगून दुचाकीवरून खवड्या डोंगरावर घेऊन गेला होता. तेथे ऋषिकेश नम्रताला परजातीच्या मुलाशी मैत्री केल्याने कुटुंबाची बदनामी होईल, तू असे करू नकोस, तू शिक्षण घे, असे समजावून सांगत होता. पण ती त्या मुलाशी मैत्री ठेवण्यावर ठाम होती. त्यामुळे चिडलेल्या ऋषिकेशने काही कळायच्या आत तिला २०० फूट उंच डोंगरवरून खाली ढकलले.
दरम्यान, नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नम्रताला बेशुद्धावस्थेत १०८ रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध
नम्रताचे गावातील एका मुलासोबत प्रेम असल्याने ती त्याच्यासोबत पळून गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिची समजूत काढून पुन्हा घरी आणले होते. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यासाठी बळदगाव येथील काकाकडे पाठवले होते. दरम्यान, प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने भाऊ ऋषिकेश नम्रताला समजावून सांगत होता. घटनेच्या दिवशीही तो तिची अनेक मार्गानी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यातून पारा चढल्याने ऋषिकेशने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.