पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुरुवातीला अपघातात झाल्याचा बनाव नराधमाने केला होता. मात्र, पोलिस तपासात त्याचं बिंग फुटलं. नराधम आरोपीला अटक करण्यात आलं आहे. पावन पांडे असं आरोपीच नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नराधम पांडेने वाकड हद्दीतून ८ वर्षीय मुलाचे शनिवारी रात्री अपहरण केले होते. आरोपी पांडे हा रसवंतीगृहात ३ दिवसांपूर्वी कामाला आला होता. त्याठिकाणी पीडित खेळत असायचा. हे पाहून नराधमाने त्याला एकदा ऊसाचा रस दिला. असं करून मुलाशी जवळीक साधली आणि शनिवारच्या रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याचं अपहरण केलं.
तिथून पाषाण तलावालगत घेऊन गेला. रात्रीच्या वेळी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. तोपर्यंत पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून त्याची शोधाशोध सुरू होती. मात्र, मुलाचा तपास लागला नाही. अखेर रात्री १० वाजता पीडिताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुसरीकडे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकाने पांडेला फोन करून गायब मुलाला पाहिलं होतं का? अशी विचारणा केली.
मात्र, मला त्याबाबत कल्पना नसल्याचं त्यानी सांगितलं. अशातच पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यात पांडे मुलाला खुणावत असल्याचं अन् मुलगा त्याच्या पाठीमागे चालत निघाल्याचं दिसलं. पुढे जाऊन दोघे अचानकपणे गायब झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं.
दरम्यान, वाकड पोलिसांनी बावधन येथे जाऊन पांडे राहत असलेल्या घरातून त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीचे तीन तास त्याने हा प्रकार सांगण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घडलेला प्रकार सांगितला. माझ्याकडून अपघात झाला अन त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार, म्हणून मी मृतदेह पाषाणमध्ये फेकल्याचे त्याने सांगितले. या दुर्दैवी घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.