पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि प्रेयसीच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरुने प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या केली. एवढंच नाही तर आरोपी राजेश रोहिदास जंबुकरनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपहरण करून हत्या केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे ११ ते २४ डिसेंबर २०२४ या दरम्यान घडली आहे. आर्यन विक्रम चव्हाण असं हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. २४ डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यनचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत आढळून आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश जंबुकरने ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपहरण केले होते. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. मात्र, आरोपी राजेंद्र जंबुकर हा सापडला नाही.
दरम्यान, २४ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जंबुकर याने राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आर्यन चव्हाण हा कुठे आहे याचा सर्वाना प्रश्न पडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी राजेश जंबुकर याला वायफाय देणारे, मदत करणारे यांना खाकी दाखवली. घटनेतील काही बारकावे आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह तालुक्यातील राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला.
आर्यन चव्हाणचे अपहरण करणाऱ्या आरोपीनीचे आर्यनचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान राजेश जंबुकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहलेली आहे, ती चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होईल असं पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.