सुरेश घाडगे
परंडा : प्रकल्प क्षेत्र व वरील भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्प पुर्ण पाणीसाठा होऊन तुडूंब भरला आहे. या प्रकल्पाची १३.५९० दलघमी पाणी क्षमता आहे .तसेच पांढरेवाडी प्रकल्पही भरला आहे. गत पंधरवडयात सर्वप्रथम चांदणी प्रकल्प भरला होता . चांदणी प्रकल्पाची २३.७८ दलघमी पाणी क्षमता आहे. हे तीन मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.
खंडेश्वरवाडी प्रकल्पाच्या भरावाला तडा गेल्याने फुटण्याचा धोका निर्माण आहे. तर या प्रकल्पातून सांडवा फोडून पाणी बाहेर काढून दिलेल्या खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाची दुरूस्तीच केली नाही. पाणी वाहून जात आहे. त्यामुळे यंदाही हा प्रकल्प रिकामाच रहाणार आहे !
सर्वात मोठे सिना कोळेगाव धरण ७५ टक्केवर पाणीसाठा असून पाणी साठ्यात वाढ सुरूच आहे. साकत मध्यम प्रकल्पात संथ गतीने पाणीसाठा वाढत आहे. या प्रकल्पाची १४.४९ दलघमी पाणी क्षमता असून केवळ २.६६ दलघमी पाणीसाठा सद्यस्थितीत आहे. तसेच सोनारी व मुगाव हे लघु प्रकल्प भरले आहेत. तर शेळगाव व वाटेफळ साठवण तलाव प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, खासापुरी मध्यम प्रकल्पाची १३.५९० दलघमी क्षमता असून या प्रकल्पातून परंडा शहराला पाणीपुरवठा होतो . त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न मिटला आहे ! तसेच या परिसरातील शेती व गाव – वाडी – वस्तीला पाणी मिळणार असल्याने जनतेला दिलासा मिळणार आहे .