राहुल अवचट
यवत : पुणे – सोलापूर महामार्गावरील चौफुला (ता.दौंड ) येथील मुख्य चौकात दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने स्थानिक नागरिक होणाऱ्या वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत.
पुणे – सोलापूर व शिरुर – सातारा बाजुंनी येणारी वाहतूक चौफुला येथे एकत्र येते. यातच भर म्हणून पुलावरच अनेक वाहने पार्कींग करत असल्याने परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब ठरत आहे. वाहतूकदारांना शिस्तीसाठी चौकात एकही वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना विनाकारण या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गांवर कोणत्याही भागात वाहतूक कोंडी होत नाही, एवढी वाहतूक कोंडी या ठिकाणी होते.
अनेक वाहने थेट रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. यामुळे अवघड वाहनांना वळण घेण्यासाठी अडचण होत असल्याने वाहतूक कोंडी होत असुन सेवा रस्त्याच्या कडेला आणि शिरूर सातारा महामार्गांवर वाहने पार्क करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई व्हावी. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती असल्यास नक्कीच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे