सासवड : गराडे धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गराडे धरण 100 टक्के भरल्यामुळे सध्या धरणातून करा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधाऱ्यामध्ये विसर्ग सुरू झाला आहे. ते तसे भरून गेल्यामुळे नाझरे धरणाकडे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे सासवड शहरात करा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे बचाव आणि मदत कार्यासाठी पुरंदर प्रशासन सज्ज असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.
गराडे, कोडीत, चाभळी, भिवरी, बोपगाव, हिवरे व सासवड शहर या परिसरात गुरुवारी रात्रभर मोठा पाऊस झाला. या पावसाने शेतकरी व व्यापार पेठेवर विपरीत परिणाम होत आहे. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्यासह अनेकांनी पुरंदर तालुक्यात नदी पात्राच्या कडेला असलेल्या खळद, गराडे परिसरात असलेली गावाची पाहणी करून मदत कार्याचा आढावा घेतला, अशी माहिती पुरंदर तहसील मधून मिळाली आहे.
गेले काहीदिवस सुरू असलेल्या पावसाने पुरंदर तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरामध्ये जोर धरू लागली आहे. तर बहुतेक ठिकाणी कोडीत, गराडे, चाभळी, बोपगाव, भिवरी, हिवरे या ठिकाणी पंचनामे हे करावे लागणार आहेत.
कारण घेवडा, वटाणा या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नुकसान या परिसरामध्ये झाले आहे. याची दखल या ठिकाणी पंचनामा करून घ्यावी लागणारच आहे. याचा फायदा हा शेतकऱ्यांना जरूर मिळावा अशी माहिती कोडीत येथील शेतकरी ईश्वर बडधे यांनी प्रतिनिधीला दिली.