राहुलकुमार अवचट
यवत : कार्तिक कृष्ण अष्टमीनिमित्त दौंड तालुक्यातील यवतचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरोना मारामारीमध्ये केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु यावर्षी मात्र उत्सव साजरा होत असल्याने आनंदाचे वातावरण होते.
आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहमध्ये रोज काकड आरती, आभिषेक महापुजा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ, सायंकाळी किर्तन व रात्री हरिजागर यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारायण समाप्ती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
जन्माष्टमीनिमित्त किर्तन हभप शंकर महाराज शेळावे (मंचर) यांच्या उपस्थितीत रात्री १२ वाजता नाथांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. श्रीनाथांचा गोंधळ, भारुड संपन्न झाले.
सकाळी ह.भ.प . श्रीहरी महाराज यादव यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठ चालक ह.भ.प. शंकर महाराज उंडे ( आळंदी ) यांच्यासोबत असलेले गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विणेकरी यांचा श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांचेकडुन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत उपस्थिती दर्शविली.