पुणे : पुण्यात सध्या एमपीएससी परीक्षांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ‘पुणे शहर बंद’ करण्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकेवर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी कडक शब्दांत आक्षेप घेत थेट आव्हान दिले आहे.

महापौर नागपुरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, रोहित पवार यांनी ताकद असेल तर पुणे शहर बंद पाडून दाखवावे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. येथे संपूर्ण देशातून लाखो तरुण उज्ज्वल भविष्यासाठी शिकायला येतात आणि जवळपास 70 टक्के विद्यार्थी नंतर इथेच स्थायिक होऊन पुणेकर बनतात. शहराने कायमच या विद्यार्थ्यांना आपुलकी आणि आश्रय दिला आहे. विद्यार्थ्यांनीही आजवर शहराच्या शांततेला कधी बाधा पोहोचवली नाही.

मात्र, शहर बंदच्या इशाऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. महाविद्यालयीन तरुण वेळेवर वर्गात पोहोचू शकणार नाहीत, तर आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना रुग्णालयात जाणे कठीण होईल. अशा वेळी पुणेकर काय असतात आणि ते कसे उत्तर देतात, याची प्रचिती आंदोलकांना येईल, असा इशारा महापौरांनी दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या सनदशीर मार्गाने मागण्या मांडाव्यात आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या फंदात विद्यार्थ्यांनी पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. सध्या रस्त्यावर उतरून विरोध करणारे खरे विद्यार्थी आहेत का, असा शंकात्मक प्रश्न विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवरही टीका केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्वतः पुण्यात राहत असताना शहराची कोंडी करणे त्यांना योग्य वाटते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला, तरी पुणेकरांना कोणतीही अडचण येऊ नये हीच आपली मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.






