दीपक खिलारे / इंदापूर : भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जात असून यामध्ये पत्रकार हे समाजमनाचा आरसा आहेत. पत्रकारांनी जिथे चूक किंवा अन्याय होतो, तिथे जरूर लिहिले पाहिजे. मात्र, जिथे चांगले काम होते तिथे कौतुक देखील केले पाहिजे. अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे प्रथम भाग्य मला लाभले, याचा मला खूप आनंद होत आहे, मात्र पत्रकार भवन होण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी एक होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाच्या दैनंदिन कामासाठी इंदापूर बस स्थानकासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत भाडे तत्त्वावर द्यावी, असे निवेदन मंत्री भरणे यांना देण्यात आले.
मंत्री भरणे पुढे म्हणाले, मला मिळालेले कॅबिनेट मंत्रीपदाचे श्रेय सर्वसामान्य जनता, पत्रकार व पक्षश्रेष्ठी यांना असून आता तुम्हाला देण्यासाठी माझ्या हातात खूप काही आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकार भवन होण्यासाठी एक होणे गरजेचे आहे. सध्या इंदापूर शहर व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. भीमा नदीवरील शिरसोडी ते कुगाव पुलाचे काम जोरात सुरू असून त्यामुळे व्यापार वाढणार आहे. इंदापूर शहरात २०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.
त्यामुळे पत्रकारांनी चांगल्या कामाचे कौतुक तर जिथे चुकेल तिथे ते निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. मी बोलण्यापेक्षा काम करणारा कार्यकर्ता आहे. या पत्रकार संघात जुन्या बरोबरच तरुण पत्रकार देखील असून या पत्रकार संघाचे काम चांगले आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, संघटक काकासाहेब मांढरे, सुरेश जकाते, शैलेश काटे, दीपक शिंदे, अंगद तावरे यांसह संघाचे सभासद उपस्थित होते.