लोणी काळभोर : हवेली तालुका पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य व दैनिक पुण्यनगरीचे लोणी काळभोर येथील धडाडीचे पत्रकार धनराज तुकाराम साळूंके ( वय ५१) यांचे आज मंगळवारी (ता.११) दुपारी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
धनराज साळूंके हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. दोन दिवसापूर्वी त्यांचा आजार बळावल्याने त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, आज (मंगळवारी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने पत्रकार बांधवांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, धनराज साळूंके हे मागील १० वर्षापासून दैनिक पुण्यनगरीमध्ये लोणी काळभोर येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. त्यांनी दहा वर्षाच्या कालावधील विविध विषयांवर सडेतोड लिखाण केले होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
धनराज साळुंखे यांच्या अकाली निधनाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे व हवेली तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब काळभोर यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या अकाली निधनाने लोणी काळभोरसह परिसरात शोककळा पसरली आहे.