अकोला: अकोला येथे वाढदिवसाच्या दिवशीच एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्याचे नाव अशीत देवलाल सोनोने (वय-२०) असे होते. अशीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कच्या द्वितीय वर्षाला होता, अत्यंत शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती, परंतु वाढ दिवसाच्या दिवशी त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशीत हा मुळचा वाशिम जिल्हयातील किनखेड, ता- कारंजा येथील होता. तो शिक्षणासाठी अकोल्यात मित्रासोबत भाड्याने खोली करून राहात होता. आत्महत्येपूर्वी अशीत बऱ्याच दिवसापासून कॉलेजलाही गेला नव्हता. दरम्यान, आत्महत्येपूर्वी पुण्यात असलेल्या मोठ्या भावाकडे जातो असे त्याने मित्रांना सांगितले होते. परंतु भावाकडे न जाते अशीतने वाढदिवसाच्या दिवशी १२ मार्च रोजी आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली. अचानक उचलल्या पाऊलाने त्याच्या मित्रपरिवारात आणि कुटुंबात तसेच महाविद्यालयात शोक व्यक्त केला जात आहे.







