पुणे : मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे महापालिकेतील रखडलेली १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे. महापालिकेने मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी १०० कनिष्ठ अभियंता भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत.
मात्र, मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातूनही अर्ज दाखल करण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे महापालिकेने अभियंता भरतीची प्रक्रिया थांबविली होती. राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरभरतीत सामावून घेण्याचा अध्यादेश महापालिकेने अभियंता भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया आयपीबीएस या संस्थेच्या माध्यमातून राबविली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. म्हणाले कि, राज्य शासनाच्या आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून नोकरीमध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, आर्थिक मागास वर्गासाठी देखील आरक्षणाचा आदेश आहे. या पार्श्वभूमीवर अभियंता भरतीची नव्याने जाहिरात काढण्याबाबत आम्ही तयारी करत आहोत. यापूर्वी आलेल्या अर्जाबाबत तसेच फीबाबतही काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडून १५ जानेवारीपर्यंत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.