पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) १५० पदांसाठी आता सरळसेवा भरती करता येणार आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. पीएमआरडीएच्या आकृतीबंधाला यापूर्वी मंजुरी मिळालेली आहे. आता सेवा प्रवेश नियमावलीलादेखील हिरवा कंदील मिळाला आहे. केवळ बिंदू नामावलीला मंजुरी मिळणे बाकी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि जिल्हा निवड समितीमार्फत ही पदे भरण्यात येणार आहे. पीएमआरडीएमध्ये वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत होती. तर, लिपीक, शिपाई आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत होते. राज्य शासनाने पीएमआरडीएच्या आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानंतर सेवा प्रवेश आणि सेवा वर्गीकरणाला (विनियम २०२३) देखील मंजुरी दिली आहे.
यापूर्वी ही मंजुरी न मिळाल्याने सरळसेवा पद्धतीने भरतीप्रक्रिया थांबली होती. दरम्यान, आता पीएमआरडीएमध्ये सर्व्हेअर, लिपीक, शाखा अभियंता, मुख्य विधी अधिकारी, विधी अधिकारी, वाहनचालक, सर्व्हेअर अशी पदे भरण्यात येणार आहेत.
पीएमआरडीएमध्ये अग्निशमन या महत्त्वाच्या विभागामध्ये विविध पदे भरण्याची गरज आहे. सध्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. आता राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन केंद्र अधिकारी ही पदे भरता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल.