बीड : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे बनावट चॅट सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांना चांगलंच महागात पडलं आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 7 जणांविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील ठोंबरे, विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत मोहसीन आझाद शेख (वय ३६, रा. सरगम सोसायटी, नांदेड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असताना सायंकाळी त्यांना सोशल मीडिया फेसबुकवर जितेंद्र आव्हाड यांचा मोबाईल नंबर व फोटो असलेला व्हाटसअॅप स्किनशॉट आला. त्यामध्ये उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज, मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे, मुंडेविरोधात आणि वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव़ तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय, तसेच मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका.
आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी, मी सांगितले आहे. कसं काय कुणावर बोलायचं, कसा मंत्री राहतो आणि अजित याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता, अशा प्रकारचे व्हॉटसअॅप चॅट जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हायरल होत आहे. ही बाब जितेंद्र आव्हाड यांना सांगितली. आरोपींनी बनावट चॅट तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हॉटसअॅप चॅट व्हायरल होत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ते फेक कस आहे, हे सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले आहे. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हे सर्व सादर केले आहे.