जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आणे पठारावर नागरिकांना नेहमीच दिसणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे. या परिसरात अद्यापपर्यंत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. आणे येथील खबाडी परिसरात स्वप्निल आहेर यांच्या पोल्ट्री फार्मजवळ दोन दिवसांपूर्वी वनविभागाकडून दुसऱ्यांदा पिंजरा लावण्यात आला होता. या भागात तीनपेक्षा अधिक बिबटे दिसत असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होती.
त्यानंतर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे पाच वर्षे वयाचा एक मादी बिबट्या रविवारी (दि. ८) रात्री जेरबंद झाला असून, पुन्हा एकदा याच भागात पिंजरा लावण्यात आला होता. शनिवारी (दि. १३) रात्री या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे चार वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा पिंजरा
आणे येथे लावण्यात येईल, अशी माहिती वनपाल राजेंद्र गाढवे यांनी दिली.
ओतूर परिसरात बिबट्यांची दहशत
जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून गावठाणाच्या चोहोबाजूंनी बिबट्यांचा वावर असल्याचे वाडी वस्तीवरील नागरिकांचे म्हणणे आहे. आधी बिबटे अंधार पडल्यावरच बाहेर पडायचे. मात्र, हल्ली बिबटे दिवसाढवळ्या दिसू लागले आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी भयभीत झाले आहेत.
बिबट्यांची संख्या वाढली असल्याने ते खाद्याचा शोधात फिरत असतात. त्यामुळे महामार्गावर रस्ता पार करताना गाडीला धडकून बिबट्या अपघातात मृत पावतात. कधी शिकार करताना विहिरीत पडून गतप्राण होत आहेत. दोन दिवसांपूवी बिबट्याची मादी आणि तिची चार-पाच महिन्यांची तीन पिल्ले कपर्दकिश्वर मंदिर, गुरवठीके शिवार ते सुटुंबा टेकडी, पाथरटवाडी, शेटेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर जाताना अनेकांनी पाहिली. या भागात बिबट्यांची दहशत इतकी वाढली आहे की, शेतात काम करणे अवघड झाले आहे.