Jayakwadi Dam : नाशिक : उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्याला पाणी सोडण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी मागील काही दिवासंपासून सुरु होती. त्यासाठी अनेक आंदोलनदेखील झाली. वादविवाद, आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर आज 25 नोव्हेंबरला पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी उशिराजायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाला त्याबाबतचे आदेश मिळाल्यानंतर रात्रीतूनच नगर, नाशिकच्या प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळा, प्रवरा, दारणा या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. मात्र, जायकवाडीत हे पाणी पोहचण्यासाठी 48 ते 50 तास लागण्याची शक्यता
शुक्रवारी रात्री उशिरा दारणा धरणाचं एक गेट तीन इंचाने उघडण्यात आला. मराठवाड्यातून पाणी सोडण्याची मागणी होत असताना दुसरीकडे नगर, नाशिकमधून पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी आंदोलनं होत होती. त्यामुळे पाण्याची ही लढाई न्यायप्रविष्ट झालेली आहे. शासनाच्या आदेशानुसार पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार आहे. नगर, नाशिक जिल्ह्यातल्या या तीन धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात येणार आहे.
यासंबंधीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय ५ किंवा ६ तारखेला येणं अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रातील आंदोलकांनी जायकावडीचा डेड स्टॉक वापरण्याची मागणी केली होती. परंतु राज्य शासानाने रात्री उशिरा आदेश काढून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. ४८ तासांमध्ये जायकवाडीमध्ये पाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे.