सागर घरत
करमाळा : करमाळा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या जातेगाव ते टेंभुर्णी या ६०.१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच होणार आहे. हे काम बीओटी तत्त्वावर होणार असून, या प्रकल्पासाठी ९३५.६६ कोटी खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाच्या निविदा प्रक्रियेबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे महाव्यवस्थापक एन. एल. यवतकर यांच्या सहीने ११ डिसेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा व संवेदनशील विषय होता. या महामार्गावर आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातांमध्ये जवळपास २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा रस्ता महाराष्ट्र सरकारकडे होता. तो रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यासाठी आपण सरकारदरबारी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासाठी सरकारने ना हरकत दाखल दिला.
दरम्यान, हा रस्ता प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाल्यामुळे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे आता महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. करमाळा तालुक्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. ऑनलाईन पोर्टलवरून ११ डिसेंबरपासून या कामाची निविदा भरता येणार आहे. त्याची अंतिम तारीख २९ जानेवारी २०२४ आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार निविदा ३० जानेवारी २०२४ रोजी साडेअकरा वाजता उघडली जाईल.
या रस्त्यामुळे करमाळा तालुक्याचा नगर व सोलापूर या जिल्ह्यांशी जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे तसेच मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्गालाही करमाळा जोडले जाणार आहे. या रस्त्याचे काम मंजूर करण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य लाभले, त्याचबरोबर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेही सहकार्य मिळाल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.