केडगाव : राज्यातील प्रत्येक नागरिकांना त्याच्या घरात नळाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी ‘हर घर जल’ योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहे.
कामाची संख्या व योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार प्राधान्याने कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची असल्याने या सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना कोणताही अनुभव नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे प्रकार उघड झाला आहे. कारण, अनेक गावातील महत्त्वाच्या रस्त्यांची या योजनेने अक्षरशः वाट लावली आहे. त्यामुळे ही योजना रस्तेमोड मिशन आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या ठिकाणावरून जसे की तलाव बंधारेवरून पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार हे लवकरत लवकर काम करण्यासाठी नियमांना फाटा देत रस्त्याच्या अगदी जवळून साईडपट्टी खोदून पाईप टाकत आहे. तर काही ठिकाणी डांबरी रस्ता सुधा जेसीबीने उखडून टाकल्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे .
तसे पाहता पाईपलाईन ही रस्ता सोडून दोन ते तीन मीटर बाहेर करणे आवश्यक असते. मात्र, ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच खोदकाम केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून, हे ठेकेदर काम झाल्यावर या रस्त्यावरील उरलेली माती सुद्धा बाजूला करत नाहीये. तसे पाहता एकतर खेडेगावातील रस्ते हे गाव पुढाऱ्यांना मंजूर करून घेताना एक एक वर्ष वाट पाहावी लागत असते. पण या झालेल्या रस्त्याची पुरता वाट लावण्याचे हे ठेकेदार काम करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन घडणारा प्रकार थांबवणे गरजेचे आहे.