मुंबई : मुंबईमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच आता मुंबईमध्ये शेजारी राहणाऱ्या आजोबानेच अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून लैंगिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना धारावीमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या राहत्या घरामध्ये घडली आहे.
या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनाच्या दिवशी मुलगी घरात एकटी होती. मिळालेल्या संधीचा फायदा घेत नराधमाने तिच्या घरामध्ये प्रवेश केला तसेच तिला चाकूचा धाक दाखवत ६० वर्षीय नराधमाने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. शेजारच्या आजोबाने स्वतःची ओळख लपवण्यासाठी मास्क घालून मुलीवर बलात्कार केला.
दरम्यान, झटापटीत मास्क थोडा बाजूला झाल्यामुळे तसेच अल्पवयीन मुलीने आवाज ओळखल्याने नराधम आजोबांचे बिंग फुटलं. आरडाओरडा केल्यास गळा कापण्याची आणि कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर ॲसिड टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली होती. गळ्यावर चाकू ठेवल्याने मुलीच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. पुढील तपास धारावी पोलीस करीत आहेत.