कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा परिसरात एक चमत्कारीक घटना घडल्याचे समोर आले आहे. इथे हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्ध रुग्णाला रुग्णालयाने मृत घोषित केलं होतं. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेकडून घरी पाठवण्यात आला होता. मात्र रस्त्यात चमत्कार घडून मृत घोषित केलेले आजोबा पुन्हा जिवंत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता 8 दिवस उपचार केल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे.
वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची सुद्धा तयारी करण्यात आली होती. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीर हालचाल करू लागले. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
१६ डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी आल्या, तेव्हा पांडुरंग उलपे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते; पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.
दरम्यान, रूग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं. नातेवाइकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितली. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले. तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले. तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.