सातारा: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात एमएसआरडीसीने १० ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना जारी करून नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पाच्या डीडीपीसाठी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. या सूचना व हरकतींना ९०० जणांनी प्रतिसाद दिला असून त्यात १० टक्के प्रतिसादकांनी आक्षेप नोंदवला आहे, तर याव्यतिरिक्त इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या या परिसरातील रहिवाशांनी प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या नवीन हिल स्टेशन परिसरात राज्य सरकारने ‘नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन विकास आराखडा’ प्रस्तावित केला आहे. त्याचा मसुदा आराखडा तयार असून ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली आहे. एमएसआरडीसीने १० ऑक्टोबर रोजी नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पासाठी डीडीपीसाठी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवून अधिसूचना जारी केली होती. मूळ आराखडा २३५ गावांसाठी आहे, जो नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पाचा भाग असणार आहे. एमएसआरडीसीच्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि समृद्धी’ होणार नाही तर हजारो रहिवाशांना त्यांची उपजीविका आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती उंचावण्याच्या अनेक संधीही मिळणार आहेत.
१,१५३ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले ‘नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन अधिसूचित क्षेत्र’ चार नियोजन विभागांमध्ये विभागले गेले आहे, जे अधिसूचित गावांमध्ये जास्तीत जास्त पर्यटन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने १३ पर्यटन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि मुख्यतः स्थानिक ग्रामस्थ, छोटे व्यापारी, तरुण, उद्योजक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेल्या १४ पर्यावरण-उत्पादन केंद्रांसोबत पर्यटन विकासाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यावर भर देणारी २० पर्यटन वाढ केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव या योजनेत आहे. स्थानिक रहिवाशांसाठी अत्यावश्यक सेवा आणि सुविधांमध्ये करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकांचे विस्थापन होणार नाही आणि भूसंपादन होणार नाही. हिल ट्रेन्स (टॉय ट्रेन्स), अपारंपरिक वाहने आणि आकर्षक लँडस्केपमधून जाणारी केबल सिस्टिम यासारखे अनोखे वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. पर्यटक आध्यात्मिक प्रवास, जलक्रीडा उपक्रम आणि ट्रेकिंग आणि झिप-लाइनिंग यांसारख्या साहसी खेळ, इको टुरिझमवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.