पुणे : नामांकित शाळेतील डान्स शिक्षकाने विद्यार्थ्यांवरच लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती. पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये असलेल्या नामांकित शाळेतील हा प्रकार असून याबाबत पुण्यातील वारजे पोलिसांनी बुधवारी शिक्षकाला अटक केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी संस्थाचालकाला देखील अटक केली आहे.
अन्वित सुधीर फाटक असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे.
विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप संस्थाचालक अन्वित फाटक याच्यावर आहे. पोलीसांनी अन्वित फाटकला अटक केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणात शाळेचे संचालक आणि ट्रस्टी तितकेच जबाबदार आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली होती. त्यानंतर पोलीसांनी दखल घेत ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी शिक्षकाला 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर संस्थाचालकाला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती, डीसीपी संभाजी कदम यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?…
पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स शिक्षक म्हणून कार्यरत होता. शाळेतील मुलांना नृत्य शिकवत असताना हा आरोपी शिक्षक गेल्या दोन वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हात लावत होता. एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला. त्यानंतर त्याच्या आई वडिलांना याबाबतची माहिती दिली आणि तत्काळ आई-वडिलांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीसुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवेला अटक केली.