राजेंद्रकुमार शेळके
Inspiring Story पुणे : मुंबईतील पवई येथे राहणारे आणि भाजी व्यवसाय करणारे सुरेश रखमाजी हांडे रोज हिरानंदानीतील महानगरपालिकेच्या बागेत मॉर्निंग वॉकला जात असत. याच बागेत महाराष्ट्राची सरस्वती अशी ओळख असलेल्या सुप्रसिद्ध लेखिका विजयाताई वाड यांचेशी एका मित्राने सुरेश हांडे यांची ओळख करून दिली. रोज होणा-या भेटीगाठीचे रूपांतर बागमैत्रीत होऊन हळूहळू वाड परिवार आणि हांडे परिवार असे कौटुंबिक स्नेहाचे एक घट्ट नाते निर्माण झाले. सुरेशरावांचे अनुभव आणि आठवणी ऐकून विजयाताईंना त्यांच्यात दडलेला लेखक जाणवला असावा.
आजारपणाने साधी सही सुद्धा करू न शकणारे सुरेश हांडे…!
विजयाताईंनीच प्रेरणा देऊन, वेळप्रसंगी मागे लागून सुरेश हांडे यांना लिहीते केले. आजारपणाने साधी सही सुद्धा करू न शकणारे सुरेश हांडे हे शिक्षक म्हणून सुरूवातीला काही काळ कार्यरत असल्याने त्यांनी या सर्वांवर मात करून वयाच्या ७३ व्या वर्षी आपल्या कष्टप्रद जीवनातील अनुभवांचं गाठोडं असलेलं ‘एव्हरग्रीन’ हे ४९२ पानांचं एक पुस्तक पूर्ण केले.
पुस्तक प्रकाशनाची धुरा सुरेशरावांना मामा म्हणणाऱ्या विजयाताईंच्या कन्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांच्या एज्युकेशन ॲन्ड कल्चरल ट्रस्टने स्विकारली. सुरेश हांडे यांनी हे पुस्तक आपल्या आईला समर्पित केले आहे. अर्थातच विजयाताई वाड यांनी आपल्या सुवर्णमयी शब्दांच्या प्रस्तावनेचा साज या पुस्तकाला चढवला आहे. दिनांक २० मे २०२१ या सुरेश हांडे यांच्या वाढदिवशी विजयाताई वाड यांचेच घरी या पुस्तकाचा घरगुती प्रकाशन सोहळा संपन्न झाला आणि पुढे दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. विजयाताई वाड यांच्याच शुभहस्ते जाहीर प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.
परंतु एक आठवडा अगोदरच डॉ. विजयाताईंची तब्येत बिघडली आणि नियोजित प्रकाशन सोहळा लांबणीवर पडला. परंतु आता मात्र शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी श्री. सुरेश हांडे लिखित ‘एव्हरग्रीन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाणे येथे डॉ. विजयाताई वाड यांच्या शुभहस्तेच ऑनलाईन पद्धतीने आणि श्री. नारायण जाधव, सिनेअभिनेते आणि लेखक,संजय नलावडे स्तंभलेखक, सुरेशजी डुंबरे, आंतरराष्ट्रीय चित्रकार, सुभाष लाड, लेखक, समाजसेवक, प्रविण तरे, उद्योजक या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
डॉ. विजयाताई वाड यांचे प्रती ॠणनिर्देश व्यक्त करताना लेखक सुरेश हांडे म्हणतात, ‘ताईंच्या स्फूर्तीमुळे मी लिहीता झालो. ताईंनीच लेखनाचे स्फुलिंग माझ्यामध्ये निर्माण केले. त्याचे फलीत म्हणून माझ्या आठवणींच्या पुष्पांचा ‘एव्हरग्रीन’ हा पुष्पगुच्छ तयार झाला. याचे सर्व श्रेय डॉ. विजयाताई वाड यांचे आहे.’
डॉ. विजयताई वाड यांचा परिसस्पर्श सुरेश हांडे यांना झाला आणि एक भाजी व्यवसायिक लेखक झाला असेच म्हणावे लागेल. या पुस्तकाबाबतची दिनांक २५ मे २०२१ रोजी एक पोस्टही मी शेअर केली होती. आता या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधीही मला प्राप्त होत आहे हे मी माझे भाग्य समजतो. मुंबई आणि ठाणे परिसरातील जुन्नरकरांनी या प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन हांडे परिवाराकडून केले आहे.