पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. याच प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्येमागील मास्टर माईंड समजला जाणारा वाल्मिक कराड यांने काहीवेळापूर्वीच पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले आहे. सीआयडीसमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर वाल्मिक कराड हा थेट पुणे सीआयडीच्या कार्यालयात जाऊन शरण आला. वाल्मिक कराड यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी याठिकाणी गर्दी केली होती. वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याता यावा, अशी मागणीही केली जात आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती. तेव्हापासून बीड पोलीस आणि नंतर सीआयडी वाल्मिक कराड याचा शोध घेत होती. मात्र, पोलीस किंवा सीआयडी कोणालाही वाल्मिक कराडला शोधण्यात यश आले नव्हते. अखेर 23 दिवसांनी वाल्मिक कराड स्वत:च्या सीआयडीच्या स्वाधीन झाला आहे. यानंतर आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराड यांची चौकशी केली जाणार आहे. मात्र, गेले 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराड सुरुवातीचे काही दिवस पुण्यातच मुक्कामाला होता. सीआयडी सूत्रांच्या मते, याप्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आली, तिच्या पुण्यातील घरी वाल्मिक कराड हा मुक्कामाला होता. साधारण आठ दिवसांपूर्वी वाल्मिक कराड हा राज्याबाहेर गेला. तो कोणत्या राज्यात होता, याची खात्री नसली तरी गाडीने पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी वाल्मिक कराड यांना दोन दिवस लागल्याचे समजते. आता वाल्मिक कराडच्या चौकशीत याबाबतची अधिक माहिती समोर येईल.