Indian Railway : प्रवासी ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करतात तेव्हा रेल्वे प्रशासन चादर, उशी, मोठी चादर आणि टॉवेल देते. त्यांच्या वापरानंतर त्या वस्तू रेल्वेतच ठेवायच्या असतात. या वस्तू ही रेल्वेची संपत्ती आहे. ती तात्पुरती प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. परंतु काही प्रवाशी या वस्तू बॅगेत भरुन घेऊन जातात. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. गेल्या काही वर्षांत या वस्तूंची चोरी वाढली आहे. या चोऱ्यांना चाप बसवा म्हणून रेल्वेने कारवाई करण्याचे ठरवले आहे.
चोरीचा व्हिडिओ व्हायरल
याप्रकरणानंतर रेल्वेने असे प्रकार न करण्याची सक्त ताकीद दिली होती. पण त्याचा काहीच परिणाम दिसला नाही. काही दिवसांपूर्वी राजधानी ट्रेनच्या एसी कोचमध्ये टॉवेल चोरताना एका महिलेचा व्हिडिओ तिथल्या अटेंडेंटने चित्रीत केला आहे. तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
टॉवेल आणि चादर चोरी करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वे एसी कोचमध्ये जागरुकता अभियान राबवविणार आहे. रेल्वेला आशा आहे की अशा कार्यक्रमामुळे रेल्वे सामानाच्या चोरीचे प्रमाण घटेल. 12952 दिल्ली- मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये तर मोठा धक्कादायक प्रकार समोर आला. एसी कोचमधील एका महिलेच्या बॅगेत टॉवेल असल्याचा संशय आला. बॅग तपासली असता त्यात एक नाही तर पाच टॉवेल आढळले.
15 दिवसांत ट्रेनमधून 500 टॉवेलची चोरी
गेल्या 15 दिवसांत ट्रेनमधून 500 टॉवेलची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेकडून आता याप्रकाराविरोधात जागरुकता अभियान चालविण्यात येणार आहे. लिनन टॉवेल हे केवळ रेल्वेत उपयोगासाठी आहेत. ते घरी घेऊन जाऊ नका, असे आवाहन रेल्वेने केले आहे. याप्रकरणी ज्या सीटवर टॉवेल, रग, चादरी आढळणार नाहीत, त्याची माहिती रेल्वेला देण्याची सूचना अटेंडेन्सला देण्यात आली आहे.
इतक्या वर्षांची शिक्षा..
रेल्वेचे सामान चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. जर तुम्ही रेल्वेचे सामान चोरी करताना आढळले अथवा तुमच्या झाडाझडतीत टॉवेल, चादर आढळली तर तुमच्या रेल्वे कारवाई करणार आहे .रेल्वे मालमत्ता अधिनियम 1966 अंतर्गत ही कारवाई करण्यात येईल. यामध्ये कमीतकमी पाच वर्षांची शिक्षा आणि दंडाच्या रक्कमेचा समावेश आहे.